ती...
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरुन जातात
तिला कळतंच नाही
तिच्याकडे पाहिलं की
पाहतच राहतो स्तब्ध होऊन
तिच्याकडे नाही पाहिलं की
तिच निघून जाते क्षुब्ध होऊन
चंद्रतारे तोडून तिला
आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही
हेही लगेच ध्यानात येतं
मग मी माझी इच्छा
एखाद्या फुलावरचं भागवतो
बुकेही नाहीच परवडत
हाही हिशेब आठवतो
पण फूल तिला द्यायची हिंमतच होत नाही
बोलणंच काय, तेव्हा
तिच्या बाजूलाही फिरकत नाही
मग एखाद्या जाड पुस्तकात
फूल तसंच सुकत जातं
सगळी तयारी, सगळी
मेहनत
नेहमी असंच फुकट जातं
काही केल्या तिच्या मनाचा
थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय
काहीसुद्धा मागत नाही
ती नाही म्हणेल,
याची भिती वाटते(२)
पण आज ठरवलंय ,
तिला सांगायचं
तिच्यासाठी असलेलं आयुष्य
तिलाच देऊन टाकायचं
कोणास ठाऊक,
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील
Comments
Post a Comment